
अमळनेर येथे झालेल्या संत संमेलनात झाला ठराव…
अमळनेर : धर्मांतर बंदी कायदा तातडीने मंजूर करावा यासह विविध पाच ठराव अमळनेर येथे झालेल्या संत संमेलनात करण्यात आले. धर्म जागरण संस्थांन जळगाव यांच्या वतीने ८ रोजी मंगळग्रह मंदिरात हे संमेलन पार पडले.
संत संमेलनात धर्मांतर बंदी कायदा , यासह मठ व मंदिर ही श्रद्धास्थाने शासनाच्या ताब्यातून मुक्त होऊन समाजाच्या अध्यात्मिक व धार्मिक कार्यासाठी स्वतंत्र झाली पाहिजेत. साधू संत धर्मगुरू व प्रवचनकार यांच्यावरील होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध कठोर कायदा करण्यात यावा. मठ व मंदिरे व त्यांच्याशी संबंधित जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ हटविण्यात यावीत व धार्मिक स्थळांचा सन्मान अबाधित रहावा , हिंदू धर्माची पवित्र श्रद्धास्थाने भीमा ,इंद्रायणी व गोदावरी या नद्यांचे वैज्ञानिक पद्धतीने शुद्धीकरण करण्यात यावे असे पाच ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी प पूज्य महंत योगी दत्तनाथजी महाराज (गुरू गोरक्षनाथ आखाडा दक्षिणमुखी मारुती शिंदखेडा ) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपली संस्कृती जपण्यासाठी प्राचीन काळापासून संतांनी योगदान दिले आहे , संतांचे कार्य व साहित्य यामुळे समाजात एकता , अध्यत्मिका समरसता , बंधुभाव ,धर्मप्रेम वाढीस लागले आहे. आजही संत हे कार्य अखंडपणे करीत आहेत.
या संत संमेलनास अमळनेर ,पारोळा ,धरणगाव , चोपडा ,एरंडोल या तालुक्यातून साधू , संत , कीर्तनकार , प्रवचनकार उपस्थित होते. त्यांनी देव ,देश आणि धर्म याविषयावर आपले विचार व्यक्त केले.




