
ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचे आवाहन…
अमळनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार असल्याने शासनाचे उपक्रम युद्धपातळीवर राबवण्यात यावेत असे आवाहन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांनी सेवा पंधरवाडा पार पाडण्यासाठी आयोजित बैठकीत सांगितले की तीन टप्प्यात हा कार्यक्रम राबवायचे असून पहिल्या टप्प्यात १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान पाणंद रस्ते विषयक मोहीम , दुसऱ्या टप्प्यात २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान ‘सर्वांसाठी घरे ‘ या उपक्रमासाठी पूरक कार्यक्रम तर तिसऱ्या टप्प्यात २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायचे आहेत. शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमती पत्र घेणे ,रस्ता अदालत घेऊन शेतरस्त्याचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे , शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे , रहिवासी प्रयोजनासाठी अस्तित्वातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करणे , शहरात आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत असल्यास शहरातील गायरान नोंदी कमी करून त्या जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणे तसेच आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत नसल्यास अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करणे आदीसह स्थानिक गरजा, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बैठकीस नायब तहसीलदार सी यु पाटील, नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, भूमिअभिलेख अधीक्षक स्मिता गावित, कल्याणी पाटील, प्रियंका पाटील, यांच्यासह मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी हजर होते.




