
अमळनेर : ग्रामीण भागातील महिलांच्या स्वावलंबनासाठी व आर्थिक सक्षमीकरणासाठी आधार बहुउद्देशीय संस्था मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वामिनी प्रोजेक्ट अंतर्गत चार दिवसीय केक मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमामध्ये अमळनेर व परिसरातील ग्रामीण भागातील 100 हुन अधिक महिला व किशोरवयीन मुलींनी सहभाग नोंदविला. महिलांनी आनंदी वातावरणात केवळ प्रशिक्षण घेतले नाही तर प्रत्यक्ष केक बनवून दाखवले आणि स्वतःचा आत्मविश्वासही दृढ केला. प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी महिलांनी स्वतः विविध प्रकारचे केक तयार केले. या अनुभवामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढला असून आम्ही घरी बसून केक मेकिंग व्यवसाय सुरू करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षणादरम्यान पायनॅपल, चॉकलेट, रसमलाई, स्ट्रॉबेरी, रेड रोज, व्हाईट फॉरेस्ट, ब्लॅक फॉरेस्ट, फ्रेश क्रीम, मावा केक, डॉल केक, ट्रिपल केक, जेली केक आदी अनेक प्रकारचे आकर्षक केक शिकविण्यात आले. महिलांना केक बनवण्याचे तंत्र, साहित्याचा योग्य वापर, सजावट, पॅकिंग व विक्रीसंदर्भात आवश्यक असे मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षक वर्षा बिरारी व ज्योती पाटील यांनी महिलांना सोप्या व प्रात्यक्षिक पद्धतीने मार्गदर्शन केले. चार दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर सर्व महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आधार संस्थेचे अध्यक्ष भारती पाटील, उमेद अभियानाच्या समन्वयीका सीमा रगडे व ज्योति भावसार यांनी प्रशिक्षण दरम्यान मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट कॉर्डिनेटर मुरलीधर बिरारी, समन्वयक उर्जीता शिसोदे, अश्विनी भदाणे, आनंद पगारे, राकेश महाजन व दीपक विश्वेश्वर यांनी परिश्रम घेतले.




