
अमळनेर:- खाणपट्टा मंजूर नसताना गलवाडे शिवारातून हजारो ब्रास मुरूमची तस्करांकडून सर्रास लूट करण्यात आली आहे. याकडे प्रशासनाने डोळे झाक केली आहे. तर या लुटीत लोकप्रतिनिधींचे पिलावळे असल्याने ते मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे तस्करांचे फावले असून शासनासह पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.
अमळनेर शहराला लागून गलवाडे शिवारातील साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या मागील बाजूला असलेल्या भागातून मोठ्या प्रमाणावर मुरुम काढण्यात आला आहे. जेसीबीच्या सहाय्याने मुरुम काढून डंपरद्वारे वाहतूक सुरू असून खाण पट्टा मंजूर नसताना हजारो ब्रास मुरूम अवैधरित्या वाहून नेला जात आहे. शहराला लागूनच असलेल्या या भागातून मुरुमची लूट सुरू असताना स्थानिक प्रशासन अनभिज्ञ असणे अशक्य आहे. यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला असून ह्या भागातील ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल, पोलिस पाटील यांनी या मुरुम चोरीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे हजारो ब्रास मुरुमची चोरी शासनाचा बुडालेला महसूल याचा बोजा सदर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यावर टाकण्यात यावा, अशी मागणी होत आहे. तरच हे अधिकारी वठनीवर येऊन कारवाई करतील.
नवीन शासननिर्णयानुसार कारवाई करणार का ?
शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असताना तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधली आहे. मूग गिळून गप्प बसण्याच्या भूमिकेमुळे तालुक्यात सर्रास वाळू उपसा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या भागातून मुरुमची वाहतूक करणारे डंपर पकडण्यात येऊन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते. मात्र त्यावर काय कार्यवाही झाली याची माहिती अद्याप मिळाली नाही. १७ जुलै रोजी राज्य शासनाच्या जी. आर. नुसार महसूल अधिकाऱ्यांनी वाळू व इतर गौण खनिज वाहतूक, वापर, उत्खनन व तस्करी करणाऱ्या व्यक्तीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र यात काही हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाईची टांगती तलवार आहे. पुरस्कारास पात्र असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाची तरी काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.




