
गौण खनिज थकबाकीदार मात्र लोकन्यायालयात गैरहजर…
अमळनेर : राष्ट्रीय लोकन्यायालयात महसूल विभागाच्या ८१० थकबाकीदारापैकी २६२ थकबाकीदारांकडून ३ लाख ६७ हजार ६९१ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गौण खनिज थकबाकीदार मात्र लोकन्यायालयात गैरहजर राहिले.
अमळनेर महसूल विभागाची गौण खनिज संदर्भात २८ जणांकडे थकबाकी आहे. अंतर्गत लेखा परीक्षण बाबत १८६ जणांकडे थकबाकी होती. तर जमीन महसूल बाबत नियत वसुलीच्या थकबाकीदारांची संख्या ५९६ होती. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , निवासी नायब तहसीलदार सी यु पाटील यांनी या थकबाकीदारांना नोटिसा देऊन १३ रोजी दिवाणी न्यायालयात लोकन्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पैकी गौण खनिज थकबाकीदार गैर हजर राहील्याने त्याची वसुली शून्य झाली. तर अंतर्गत लेखा परीक्षण चे ६४ थकबाकीदारांनी ६१ हजार ११६ रुपये व नियत वसुली थकबाकीदारापैकी १९८ जणांनी ३ लाख ६ हजार ५७५ रुपयांची अशी एकूण ३ लाख ६७ हजार ६९१ रुपये वसुली झाली.




