
वाळूमाफियांना आवार घालण्यासाठी नवीन डॅशिंग अधिकाऱ्याची गरज आहे का ? सामान्य अमळनेरकरांचा सवाल
अमळनेर:- तालुक्यात यत्र तत्र सर्वत्र अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याने वाळूमाफियांसह झारीतले शुक्राचार्य व कलेक्शन एजंट मालामाल होत आहेत. तालुक्यातील पांझरा नदीपात्रात डंपरची गर्दी झाल्याने बुधगाव येथील तापी नदीपात्रातून वाळूची वाहतूक तालुक्यात सुरू आहे. आता या मोकाट सांडासारख्या सुटलेल्या वाळू माफियांना आवार घालण्यासाठी नवीन डॅशिंग अधिकाऱ्याची तालुक्यात गरज आहे असे बोलले जात आहे.

तालुक्यात दोन कलेक्शन एजंटद्वारे प्रती ट्रॅक्टर व डंपरची वसुली सुरू करून वाळूला खुली सूट दिल्याचे चित्र आहे. तालुक्यात संपूर्ण पांझरा काठावरील नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे नदीबाहेर वाळू आणली जात असून नंतर ती डंपरने भरून अमळनेर शहरात आणली जात आहे. यात २० ते २२ डंपरद्वारे पांझरा नदी ओरबाडली जात असून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक केली जात आहे. कळंबू, मांडळ, तांदळी जवळील पडावद फाट्याजवळून पांझरा नदीतून ही वाळू उचलली जात आहे. त्यामुळे नजिकच्या काळात पांझरा काठावरील गावांची भूजलपातळी मोठ्या प्रमाणावर खालावणार आहे. १७ रोजी रात्री कळमसरे ते तांदळी दरम्यान पकडलेले एक वाळूचे डंपर पैलवान असलेल्या कलेक्शन एजंटने फोनद्वारे सूचना दिल्याने सोडून देण्यात आल्याची माहिती आहे.
तालुक्यातील नदीपात्रात डंपर आणि ट्रॅक्टरची गर्दी झाल्याने चोपडा तालुक्यातील बुधगाव भागातील तापी नदीपात्रातून चार डंपरद्वारे तालुक्यात वाळू आणली जात आहे. त्यामुळे विधायक कामांसाठी ओळखला जाणारा अमळनेर तालुका आता वाळूमुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला आला आहे.
कलेक्शन एजंट होतायेत मालामाल…
प्रती डंपर ठराविक रकमेचे कलेक्शन करण्यासाठी दोन एजंट नेमण्यात आले असून झारीतले शुक्राचार्यासोबत ह्या एजंटचा खिसा ही गरम होत आहे. ठराविक वाहनाची रक्कम देऊन जास्तीच्या वाहनांची उर्वरित रक्कम ही खिशात ठेवत असल्याने वाळू माफियासोबत कलेक्शन एजंट ही गब्बर होत आहेत. संघटितपणे गौण खनिजाची लूट करण्याची नवीन पद्धत तालुक्यात सुरू झाल्याने इतर तालुक्यातही याचा आदर्श नक्कीच घेतला जाईल.
तहसीलदार फेल, प्रांताकडून असलेली आशा ही फोल ठरण्याची चिन्हे…
वाळू माफियांना आवार घालण्यात तालुक्याचे तहसीलदार नाकाम ठरले असून सडेतोड कारवाई करण्यात सपशेल फेल झाले आहेत. वाळूच्या छोटा टेम्पो व ग्रामस्थांनी पकडलेला ट्रॅक्टर चालवत फुशारकी मारणारे तहसीलदार डंपरच्या सुसाट वेगामुळे चांगलेच उघडे पडले आहेत. मात्र प्रशासकीय कामात वेगवान असलेले व थोड्याच कालावधीत अमळनेरकरांवर छाप पाडणारे उपविभागीय अधिकाऱ्यांची या वाळू प्रकरणामुळे चांगलीच नामुष्की होत आहे. या अमर्याद वाळू वाहतुकीला उपविभागीय अधिकारीच आळा घालतील अशी अनेकांना आशा होती, मात्र ती आशा ही आता मावळताना दिसत आहे. त्याच्यावर कोणाचा दबाव असल्यामुळे कारवाईत दिरंगाई होत आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र कार्यालयीन कामात तरबेज असणारा हा अधिकारी कुजबुज करणाऱ्याच्या विळख्यात सापडला असल्याचे चित्र दिसत असले तरी उपविभागीय अधिकारी हलक्या कानाचे नाहीत असेही अनेकांचे म्हणणे आहे. आता उपविभागीय अधिकारी यांनी अनेकांना आशा लागून असलेली फोल न ठरवता धडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.




