
वाळू उपश्यामुळे ग्रामस्थ झाले आक्रमक, अधिकारी पैसे घेत असल्याचा केला आरोप…
अमळनेर – अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे 17 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत अवैध वाळू उपशाचा मुद्दा चांगलाच गाजला. ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत तहसीलदार रुपेश सुराणा यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तालुक्यातील पांझरा नदीतून बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप करत, यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामसभेत उपस्थितांनी तहसीलदार सुराणा यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. रात्री-अपरात्री वाळूने भरलेले ट्रॅक्टर आणि डंपर बेधडकपणे धावत असतात, त्यामुळे गावातील शांतता भंग पावली आहे. या अवैध वाहतुकीमुळे रस्ते खराब होत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे. वाळू माफियांना प्रशासनाचा धाक नसल्याचे दिसून येत असून, उलट आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. तसेच हफ्ते घेतल्यामुळे प्रशासन कारवाई करत नाही का ? असा खडा सवाल ग्रामस्थांनी तहसीलदारांना विचारला. तसेच अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप करण्यात आला. अवैध वाळू उपसा तात्काळ थांबवून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली. तहसीलदार सुराणा यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र हे आश्वासनानंतर कारवाई होते की फक्त पोकळ आश्वासन ठरते हे कळेलच. मात्र या घटनेमुळे अवैध वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रतिक्रिया…
गेल्या सहा आठ महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असून अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र कारवाई न झाल्याने ग्रामसभेच्या वेळी ग्रामस्थांचा उद्रेक झाला. आतातरी प्रशासनाने वाळू माफियांना आवार घालावा अन्यथा पांझरा काठावरील गावागावात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील. :- सौ. कविता दीपक बडगुजर, सरपंच मांडळ ग्रामपंचायत




