
अमळनेर :- तालुक्यातील रामेश्वर बु. येथील अल्प भूधारक शेतकरी संजय लोटन पाटील यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार होते. मात्र ते बँकेच्या तांत्रिक चुकीमुळे भलत्याच खात्यावर जमा झाले होते. परिणामी गेल्या दीड वर्षापासून संबधित शेतकरी बॅंकेच्या चकरा मारीत होता. अखेर दीड वर्षानंतर त्याला न्याय मिळाला आहे.

रामेश्वर बु. ता. अमळनेर येथील अल्प भूधारक शेतकरी संजय लोटन पाटील यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान रक्कम रुपये ३२ हजार १७ रुपये हे डीबीटी पात्र शेतकऱ्याच्या खात्यात जमा न होता. ते चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथील शेतकरी संजय लोटन पाटील शाखा अडावद येथील खात्यावर जमा झाले होते. ही तांत्रिक चूक बँकेकडून झाली होती. त्याची शिक्षा मात्र रामेश्वरचा लाभार्थी शेतकरी गेल्या वर्षेभरापासून भोगत होता. चोपडा तालुक्यातील अडावद येथील जिल्हा बँकेच्या शाखेत वरगव्हाण येथील शेतकऱ्याच्या खात्यावर ते पैसे जमा झाले असल्याचे बँकेच्या संबंधीत अधिकारी यांच्या निदर्शनास येऊनही संजय लोटन पाटील यांना टोलवा टोलवी सुरु होती. संजय लोटन पाटील यांचे खाते आधार लिंकशी जुळलेले असताना त्यांची रक्कम नजरचूकीने वरगव्हाण ता. चोपडा येथील संजय लोटन पाटील यांचा खाते क्रमांक८१२००१२०२००००९६५६ यावर जमा झाले होते.
जळगाव जिल्हा बँकेकडून दखल घेत ता. १५ सप्टेंबर रोजी या रकमेचा मूळ मालक यांचा खाते क्रमांक नं.८१२०७९२०२१०००३७९ या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचे अडावद शाखेचे शाखाधिकारी यांनी सांगितले.वरगव्हाण ता. चोपडा येथील संजय लोटन पाटील यांच्या खात्यावर १५ फेब्रुवारी २०२३रोजी ही रक्कम बँकेच्या तांत्रिक चुकीमुळे जमा झाली होती. रामेश्वर बु. येथील संजय लोटन पाटील या पात्र लाभार्थी शेतकऱ्याला ही रक्कम मिळवायला गेली दीड वर्षे वाट पाहावी लागली.
याबाबत तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांनीही पत्र व्यवहार केला होता.बाजार समितीचे संचालक व पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील यांनी सहकार मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हा बँकेच्या अनागोंदी कारभार विषयी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.




