
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे मांडळ ग्रामपंचायतीने उचलले पाऊल…
अमळनेर: पांझरा नदीतून होणारी बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखण्यासाठी तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा निष्क्रीय ठरल्यामुळे अखेर मांडळ गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने स्वतः पुढाकार घेतला आहे. सरपंच, ग्रामसेवक आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रात मोठे खड्डे खोदून वाळूची अवैध वाहतूक थांबवली आहे. महसूल प्रशासनाने याप्रकरणी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे.

तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गेले अनेक दिवस पांझरा नदीतून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे नदीकाठच्या शेतीत मोठे नुकसान होत होतं. ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळे वाळू माफियांना प्रोत्साहन मिळत होतं. या गंभीर परिस्थितीची दखल घेत गावातील सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की, तालुका प्रशासनाची वाट न पाहता आपण स्वतःच ही वाहतूक थांबवायची. त्यानुसार, गावातील शेतकरी बांधवांना सोबत घेऊन जेसीबीच्या मदतीने नदीपात्रात खोल खड्डे तयार करण्यात आले. यामुळे आता वाळूने भरलेले ट्रक किंवा ट्रॅक्टर नदीपात्रातून बाहेर काढणे शक्य होणार नाही. ग्रामस्थांच्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाळू माफियांच्या विरोधात ग्रामस्थांनी घेतलेला हा पवित्रा निश्चितच इतर गावासाठी एक आदर्श ठरू ठरणार असून गावागावात वाळूचोर आणि निष्क्रीय अधिकाऱ्यांच्या विरोधात असंतोषाचे वातावरण तयार होत आहे.
महसूल बघ्याच्या भूमिकेत, गावागावात असंतोषाचे वातावरण…
तालुक्यात अमर्याद वाळू उपसा सुरू असताना तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने आता नदीकाठच्या गावात असंतोष उफाळला असून तालुक्याचे अधिकारी निष्क्रीय असल्याने ग्रामस्थ वाळूचोरांचा बंदोबस्त करण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व काही अघटीत घडल्यास त्याला संबंधित अधिकारीच जबाबदार असतील.
प्रतिक्रिया…
तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याने गावात असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे अखेर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन वाळूचोरांच्या वाटा रोखल्या आहेत. -कविता दीपक बडगुजर, सरपंच मांडळ




