
अमळनेर : तालुक्यातील भोरटेक येथील जिल्हा परिषद शाळेत चार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने शाळा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आणि जर यापुढेही विद्यार्थी शिक्षण घेताना आढळले नाहीत तर शाळा पुन्हा बंद करण्यात येईल असा इशारा उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी दिला आहे.

तालुक्यातील भोरटेक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या तीन वर्षांपासून एकही विद्यार्थी शिक्षण घेत नव्हता म्हणून गटशिक्षणाधिकारी यांनी काही स्थानिक नागरिकांच्या समक्ष शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता व येथील शिक्षकांना दुसऱ्या शाळेत वर्ग करण्यात आले होते. मात्र काही गावकऱ्यांनी आम्हाला शाळा बंद करण्याबाबत विचारले नाही म्हणत गटशिक्षणाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करत तक्रार केली होती. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी भोरटेक शाळेवर येऊन समक्ष चौकशी केली तसेच गावातील अंगणवाडीची पाहणी केली , काही नागरिक व पालकांशी चर्चा केली. दरम्यान या शाळेवर नियुक्त शिक्षक दाम्पत्याने परिसरात मजुरीसाठी आलेल्या कामगारांच्या तीन मुलांना वयोगटानुसार शाळेत प्रवेश दिला. तसेच गावातील पोलीस पाटील यांच्या पाल्याला देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिप प्राथमिक शाळेत प्रवेश दिला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणवेश घेऊन शिकवण्याचे काम सुरू केलेले आढळून आल्याने मुलांच्या शिक्षणासाठी शाळा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया
गावातील नागरिकांनी मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिक्षकांनी मुलांना नियमित शिकवून विद्यार्थी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जर या शाळेत मुले शिक्षण घेत नसल्याचे आढळले तर शाळा पुन्हा बंद करता येईल.- स्वाती हवेले,उपशिक्षणाधिकारी, जिप जळगाव
सुमारे ४० लोकांच्या स्वाक्षऱ्या होत्या. त्यांना विश्वासात घेऊन विद्यार्थीच नसल्याने विनाकारण शाळेवर शासनाचा पैसा खर्च करण्यापेक्षा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. – रावसाहेब पाटील, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अमळनेर




