
पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे, अन्यथा खोट्या गुन्ह्यात फसतील:-पीआय निकम
अमळनेर : मुलांचे अपहरणाचा रील करणे अमळनेरातील तिघांना चांगलेच महाग पडल्याची घटना अमळनेर शहरात घडली. पोलिसांनी खाक्या दाखवून नंतर तंबी देऊन त्या तरुणांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

१९ रोजी तीन तरुण दुपारी शहरातील शिवाजी बगीच्याजवळ तोंडाला रुमाल बांधून मुलांना अपहरण करण्याचा रील बनवून प्रॅंक करणार होते. तिघांनी मोटरसायकलवर दोनो को उठाया है अब तिसरे को उठाना है म्हणत एका लहान मुलाकडे धावले. मुलगा घाबरला अन पळत सुटला. तेव्हढ्यात एक सैन्य दलातील तरुणाने त्यांना हटकले असता तिघांनी मोटरसायकल च्या नम्बर प्लेट वरील नम्बर पायाने झाकून पळ काढला. मुलगा घाबरत घरी गेला. आपल्या पालकांना सांगितले. पालकांनी सरळ पोलीस स्टेशन गाठले. घाबरलेल्या मुलाला पाहून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी य पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार ,विनोद संदानशिव , उदय बोरसे , उज्वल पाटील ,मयूर पाटील यांच्या पथकाला सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी पकडायला पाठवले. पोलिसांनी विविध कॅमेरे तपासल्यावर त्यांना तिघे तोंडावर रुमाल बांधून पळताना दिसले त्यांच्या मोटरसायकलच्या नम्बर वरून त्यांची ओळख पटल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवला. त्यावेळी त्यांनी खरा प्रकार सांगितला की आम्ही रील बनवत होतो. मात्र मुले घाबरल्याने तेही घाबरले आणि पळ काढला. मुलांचा अधिक तपास केला असता दोन मुले गरीब मजुरांची होती आणि एक अधिकाऱ्यांचा मुलगा होता. काही समाजसेवकांनी मुलांच्या वर्तनाची हमी दिली.
पालकांनी आपली मुले कोठे जातात, काय करतात याची माहिती घेऊन मोबाईल तपासावेत अन्यथा मुले गमतीत खरे गुन्हेगार बनतील किंवा खोट्या गुन्ह्यात फसतील- दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक,अमळनेर




