
ठेकेदाराचे लाड पुरवण्यासाठी अधिकाऱ्यांनी बुंध्यांसकट काँक्रीटीकरण करून कोंडला झाडांचा श्वास…
माझी वसुंधरा अभियानात लाखोंचा खर्च आणि पालिकेच्या हद्दीतच पर्यावरणाची हानी, ठेकेदारावर कारवाईची प्रतीक्षा…
अमळनेर– शहरातील पिंपळे रोड परिसरातील विठ्ठल नगर मधील खुल्या भूखंडात नगरपालिकेने अगोदरच लाखो रुपये खर्च करून वॉल कंपाऊंड,2 गेट, सामाजिक खुला सभागृह, तसेच मॉर्निंग वॉक साठी कंपाउंडलगत चारही बाजूने फ्लेवर ब्लॉक बसवून अनेक वर्षापासून नागरिकांना वापरासाठी उपलब्ध करून दिलेले असताना सदर ओपन प्लेसमध्ये डेरेदार वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड असून सर्व झाडांच्या बुंध्यासह सरसकट काँक्रीटीकरणाचे काम तीन दिवसापासून चालू आहे.

सदर काँक्रीटीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे पिंपळे रोड परिसरातील दोन्ही विभागापैकी एका विभागाच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची कॉन्टिटी कमी भरत असल्याकारणाने संबंधित ठेकेदाराने एका मोठ्या राजकीय लोकप्रतिनिधीच्या जवळचा असल्याचे भासवून व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासत उरलेल्या कामाची कॉन्टिटी सदर खुल्या भूखंडात कॉंक्रिटीकरण करून घेत न्यायालयाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत शासकीय पैशाचा अपव्यय करण्याचा घाट संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी घातला आहे.
ठेकदारावर कारवाई करण्याची हिंमत मुख्याधिकारी दाखविणार का ?
खुला भूखंड नगरपालिकेचा मालकीचा असताना देखील सदरचे अनधिकृतपणे सुरू असलेले कॉंक्रिटी करण्याचे काम नपाचे मुख्याधिकारी व बांधकाम विभागाचे अभियंते यांनी सदरच्या कामाचा कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तसेच कामाची लाईन आऊट आम्ही दिलेली नसून सदरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे.असे सांगून आपली जबाबदारी झटकली व आपल्या मालकीच्या जागेत सुरू असलेले विनापरवानगीचे अनधिकृत काम बंद पाडण्याचे व ठेकेदारावर कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही. त्यामुळे अधिकारी आता गब्बर झालेल्या ठेकेदारांना घाबरू लागले की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या कररुपी पैशांवर ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून डल्ला
पालिकेकडून एकीकडे माझी वसुंधरा अभियान लाखो रुपये खर्च करून राबविले जात असताना दुसरीकडे मात्र आपल्या मालकीच्या जागेत काँक्रिटीकरण करताना झाडांचे बुंधे मोकळे ठेवण्याचे न्यायालयाचे निर्देश असताना झाडांचे बुंधे सर्रासपणे काँक्रिटीकरण करून आवळले जात असल्याने ही झाडे धोकादायक बनली आहेत. झाडांभोवती काँक्रिटीकरण केल्याने झाडांची वाढ खुंटली जाऊन ते कधीही कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत असल्याने नगरपालिकेने त्वरित कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र इतर वेळी तत्परता दाखविणाऱ्या पालिकेने राजकीय दबावापोटी अनधिकृत काँक्रिटीकरणाचे काम बंद न केल्यामुळे परिसरातील पर्यावरण प्रेमी व नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करून पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. आता पालिकेच्या हद्दीत अनधिकृत काम करणाऱ्या व झाडांचा श्वास कोंडणाऱ्या लाडक्या ठेकेदारावर पालिका कारवाई करते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया
विभागाच्या अभियंताकडून माहिती घेतली असता शहरातील पिंपळे रोड परिसरातील विठ्ठल नगर मधील ओपन स्पेस मध्ये सुरू असलेले कॉंक्रिटीकरण्याचे काम आमच्या विभागाचे नसून ओपन स्पेसची मालकी असलेल्या नगरपालिकेचे आहे. :- सुभाष राऊत, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर
प्रतिक्रिया
शहरातील विठ्ठल नगर मधील ओपन स्पेसची मालकी पालिकेची असून काँक्रिटीकरणाचा कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) पालिकेने दिलेला नाही.सदरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असून नगर अभियंतांना काम बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. – तुषार नेरकर, मुख्याधिकारी, नगरपरिषद अमळनेर




