
ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून मदतीचा हात, दानशूरांना मदतीचे आवाहन…
अमळनेर:- तालुक्यातील मेहरगाव येथील गावाची पाणीपुरवठ्याची मोटर चालू करायला गेलेला ग्रामपंचायत शिपाई शॉक लागून गंभीर जखमी झाला आहे.

१७ रोजी मेहेरगाव येथील गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी मोटर सुरू करायला गेलेले प्रफुल्ल श्रीधर पाटील (वय ३८) यांना शॉक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ अमळनेर येथील नर्मदा फाउंडेशन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकटाच कमावता व्यक्ती असल्याने घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी विभागीय सचिव सुभाष पाटील, तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव सुभाष पाटील, सदस्य गोपाल कोळी, प्रदीप धनगर, प्रदीप महाजन आदी उपस्थित होते. मेहरगाव ग्रामपंचायत व गावातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा दात द्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष…
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळत नसून सहा सहा महिने पगार होत नाही. तसेच गावागावात व्यवस्था सांभाळण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचारी करत असूनही त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचे कोणतेही लाभ मिळत नाही. किमान आरोग्य विमा व जीवन विम्याचे संरक्षण कवच तरी ग्रामपंचायतीने द्यावे अशी मागणी होत आहे.




