
अमळनेर : तंबाखू न दिल्याच्या कारणावरून एकाने पैलाड भागातील ३८ वर्षीय मुकेश धनगर याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना २१ रोजी रात्री घडली. निखिल विष्णू उतकर वय ४५ रा करंजा पंचवटी नाशिक असे आरोपीचे नाव असून त्याला लागलीच पोलिसांनी अटक केली आहे.

दिनेश भिका धनगर याने पोलिसाना फिर्याद दिली की त्याचा भाऊ मुकेश भिका धनगर वय ३८ रा स्वामी विवेकानंद कॉलनी पैलाड हा रात्री ११ वाजता घराबाहेर गेला होता. हेडावे नाक्यावर वडाच्या झाडाखाली त्याचे कोणाशी तरी भांडण सुरू असल्याचे प्रवीण पारधी याने सांगितले. घटनास्थळी जाऊन पाहिले असता दोघांमध्ये तंबाखू दिली नाही यावरून वाद सुरू होता. दिनेश त्यांचे भांडण सोडवायला गेला असता आरोपी ने त्यालाही दगड मारला. म्हणून तो घरी जाऊन त्याच्या भावाना बोलवायला गेला. परत येऊन बघितले असता आरोपी निखिल उतकर हा मुकेशच्या डोक्यात ओबडधोबड दगडाने डोक्यात व तोंडावर मारत होता. मुकेशला सोडवून दवाखाण्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व त्यांच्या पथकाने आरोपीला लगेच अटक केली असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.




