
अमळनेर : बोरी नदीच्या पुरात अडकलेल्या कुत्र्याच्या तीन पिल्लांना वाचविण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

२२ रोजी रात्री प्रचंड पाऊस झाल्याने बोरी नदीला अचानक पूर आला. २३ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास या पुरात कुत्र्याचे तीन पिल्लू अडकून पडले. नदीतील एका उंच दगडावर ते जाऊन बसले होते. पुराच्या पाण्याची पातळी वाढण्याची भीती होती. प्राणी प्रेमी कुसुम भाटिया यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना कळवल्यावर त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनास्थळी रवाना केले. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाने पट्टीचे पोहणारे तौसिफ अली सय्यद, आसिफअली शेराअली, अग्निशमन दलातील कर्मचारी फारुख शेख ,दिनेश बिऱ्हाडे, आकाश संदानशिव, लखन कंखरे, भिका संदानशिव, अजय बिऱ्हाडे यांनी पुराच्या पाण्यात उडी घेऊन दोर बांधून एकमेकांना आधार देत तिन्ही पिल्लांचे प्राण वाचवले आहेत. तिन्ही पिल्लांना पालन पोषणासाठी कुसुम भाटिया यांच्या ताब्यात दिले.




