
अमळनेर(प्रतिनिधी):- कविता समजून घ्यायची असेल, तर तिचे गाणे केले पाहिजे या भूमिकेतून मी कविता स्वरबद्ध केल्या’, अशी भावना प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केली.

येथील मराठा मंगल कार्यालयात मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्यातर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमवार (ता.२२) रोजी झाले.आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.एका संगीतकाराची मुसाफिरी या विषयावर कौशल इनामदार बोलत होते.यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक हरी भिका वाणी,सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना विक्रांत पाटील,माजी नगरसेवक विक्रांत पाटील प्रमुख पाहुणे होते.प्रास्ताविक म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी केले.
यावेळी पुढे बोलतांना इनामदार यांनी सांगितले की, प्रत्येक पिढीला ज्याचा नव्याने अन्वयार्थ लावावा, असे वाटते ते अभिजात अशी माझी धारणा आहे. पूर्वसूरींच्या खांद्यावर बसून आम्ही पाहत असल्याने आम्हाला वेगळे दिसते असेही त्यांनी सांगितले.
‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे’……‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’……’क्षितिज जसे दिसते, तशी म्हणावी गाणी’…. ‘सूर मागू मी कसा जीवना तू तसा मी असा’….यांसह विविध गीते त्यांनी सादर केले.
एकाच संगीताच्या तालावर विविध गाणे कसे स्वरबद्ध व संगीतबद्ध केले जातात हे त्यांनी त्यांच्या सुरातून व संगीतातून दाखवले यावेळी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
सूत्रसंचालन स्नेहा एकतारे यांनी केले तर प्रा.शाम पवार यांनी आभार मानले.




