
वन्य जीवांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी माजी मंत्री तथा आ.अनिल पाटलांना निवेदन
अमळनेर-तालुक्यातील उदयनगर – जानवे वनक्षेत्रा लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे वन्य जीवांपासून संरक्षण होण्यासाठी अनुदानावर तार कुंपण मिळावे या मागणीचे निवेदन उदयनगर चे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ व सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघ यांच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांना देण्यात आले.

यात म्हटले आहे की अमळनेर तालुक्यातील उदयनगर, जानवे, कावपिंत्री, इंद्रापिंप्री व पारोळा तालुक्यातील सुमठाने, इंधवे, पिंपळकोठा आदी गावांचे परीसरात वन क्षेत्र (जंगल) असुन सदरील जंगल परिसरात नीलगाय, हरीण, जंगली डुक्कर, मोर असे विविध प्रकारचे प्राणी असुन वरील प्राणी हे जंगलातून बाहेर येवून मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान करत असतात. शेतकऱ्यांना आपली पिके वाचवण्यासाठी दिवस रात्र शेतात पहारा द्यावा लागतो तरच पिक थोडे फार हातात येते. प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकाची पेरणी करूनही हातात काही येईल याची खात्री नसल्याने जंगलं परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तर स्वतः जमीन कसणेच बंद केले आहे.
आधीच सदर भाग हा कायम स्वरुपी दुष्काळी त्यात वन्य प्राण्यांचा त्रास त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असुन त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. खरीप पीकांचे हे हाल आहेत तर रब्बी हंगामा बावत याहूनही कठीण परिस्थिती असते. सदर जंगलात कायमस्वरूपी पाणवठ्यात पाण्याची व्यवस्था करुन संपुर्ण जंगलपरिसराला तारेचे कुंपण करावे व जंगल परिसरातील शेतकऱ्यांनाही शासनाने अनुदानातून तारेचे कुंपण द्यावे जेणे करुन पिकांची होणारी नासधूस थांबेल व शेती उत्पन्नातून दोन पैसा शेतक:याच्या हातात येईल अशी मागणी प्रकाश वाघ व राजेश वाघ यांनी केली आहे.




