
दोन पोलिसांसह पन्टर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात...

अमळनेर:- प्रवासी वाहनात अवैधरित्या गॅस भरणाऱ्या एकाकडून लाच मागणे पोलिसांना चांगलेच भोवले असून अमळनेर पोलिस ठाण्याचे दोन पोलिसांसह एक पन्टर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे अमळनेर येथील धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये एल.पी.जी. गॅस सिलेंडर मधुन कॉम्प्रेसर मशीनच्या सहायाने वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करतात. सदरचा व्यवसाय करत असतांना अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे हे तक्रारदार व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणी येवुन तक्रारदार यांना “तुला वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हास दरमहा १५,०००/- रुपये हप्ता दयावा लागेल, नाहीतर तुझ्यावर अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरत असल्याचा गुन्हा दाखल करतो. अशी धमकी देत तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याची तक्रार यांनी दि.२३ रोजी ला.प्र.वि. धुळे कार्यालयात तक्रारदाराने समक्ष येऊन दिली होती. सदर तक्रारीची दि.२३ रोजी पडताळणी केली असता दोन्ही पोलिसांनी तक्रारदार यांच्याकडे १५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १२,०००/- रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर सापळा लावला असता पोलिस अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे यांनी उमेश भटु बारी (रा. अमळनेर) यांच्याकडे अमळनेर येथील बहादरपुर रोडवरील पाचपावली मंदिरासमोरील मिनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये स्वराज्य पानाचे दुकानात पैसे देण्यास सांगितले. तक्रारदार यांच्याकडुन १२,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना पन्टर उमेश बारी याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यावरून अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई पथकात लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, पोकॉ. प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींचा समावेश होता.




