
जानवे- उदय नगर वनक्षेत्रात जेसीबीच्या साहाय्याने वृक्षारोपण…
अमळनेर-पावसाळा संपत आला असताना वनविभागाला जानवे- उदय नगर वनक्षेत्रात वृक्षारोपणाचे शहाणपण सुचले असुन जेसीबीच्या साहाय्याने वृक्षारोपण होत आहे.सदर यांत्रिकीकरणामुळे वन्य प्राणी भयभीत झाले असून ते जंगल सोडून शेती परिसरात शिरू लागले आहेत.

वन्य प्राणी शेती शिवारात घुसत असल्याने शेती पिकांचेही नुकसान होत आहे.सदर जानवे- उदय नगर लगत मोठे वनक्षेत्र असून याठिकाणी हरीण, नीलगाय,ससे,मोर यासह अनेक वन्य प्राण्यांचा रहिवास आहे.सदर जंगल परिसराकडे वन विभागाचे नेहमीच दुर्लक्ष झाले असून त्यामुळे वन्य प्राण्यांची नेहमीच गैरसोय होत असते. याठिकाणी नुकतेच सुमारे 25 एकर जागेत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुरू झाली आहे.खरे पाहता वृक्ष लावायचेच झाले तर मार्च महिन्यात मजुरांकडून खड्डे करून त्यानंतर जुलै मध्ये पाऊसाला सुरुवात होताच झाडे लावल्यास फायद्याचे ठरत असते मात्र तीन महिने झोपा काढून आता पावसाळा संपत आल्यावर वृक्षारोपण करण्याचे शहाणपण या विभागाला सुचले आहे.एकंदरित आता झाडे लावल्यास त्याचा फायदाच नसून यामुळे शासनाचा मोठा निधी मातीमोलच होईल असा दावा या परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.
वन परिसरात यांत्रिकीकरणास परवानगी कशी ?
वन तथा जंगल परिसरात शक्यतोवर यांत्रिकीकरणास परवानगी न मिळता मंजुरांकडूनच कामे केली जात असतात कारण यामुळे वन्य प्राणी भयभीत होऊन त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असते.असे असताना असताना याठिकाणी चक्क जेसीबीच्या साहाय्याने खड्डे करून झाडे लावली जात असल्याने ही परवानगी दिलीच कुणी? असा सवाल उदय नगरचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ यांनी उपस्थित केला आहे.यासंदर्भात सखोल माहिती आपण घेणार असून शासनाच्या निधीचा अपव्यय होऊ देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.




