
अमळनेर पोलिसात एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल…
अमळनेर : देवी तुमची नाही , तुमच्याकडून देवाची पूजा होणार नाही असे म्हणत लोकनियुक्त महिला सरपंचाला इंदासनी मातेची पूजा करताना धक्काबुक्की केल्याचा प्रकार २२ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील नगाव येथे घडला आहे.

तालुक्यातील नगाव येथे २२ रोजी रावसाहेब पाटील व मनोहर पाटील यांनी महिला सरपंचला फोन करून कळवले की आम्हाला सुतक असल्याने तुम्ही गावातील इंदासनी मातेची पूजा करून घ्या, असे सांगितले. त्यामुळे महिला दुपारी पूजा करायला गेली असता पुजारी मंदिर उघडण्यास टाळाटाळ करीत होता. मंदिर उघडल्यावर पूजा करताना नंदू परीक्षित जाधव त्याठिकाणी आला आणि त्याने मागाहून सरपंच महिलेला धक्का मारत इथे तुम्ही पूजा करायची नाही ,आणि हातातील तांब्या फेकून महिलेला बाजूला लोटून दिले. तुम्हाला गावात कोणत्याही मंदिरात घुसू देणार नाही, तुमचे हात पाय तोडून टाकेल अशी धमकीही दिली आणि स्त्री मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. महिला त्यांच्या सुनेसह घरी निघून गेल्या. त्यांनतर त्यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिल्याने नंदू परीक्षित जाधव यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ , ३५१(२),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.




