
चौघांनी सोने व रोकडसह २ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला…
अमळनेर : घरमालक ड्युटीला निघताच चार जणांनी हातात चाकू घेऊन घरातून सुमारे सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण २ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना २५ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

दीपक पुंडलिक पाटील (रा अयोध्यानगर) हे रेल्वेत तांत्रिक म्हणून नोकरीला आहेत. पहाटे ५ वाजता ते नोकरीला जायला निघाले आणि काही वेळात त्यांच्या घरात चार अज्ञात चोरट्यानी हातात चाकु घेऊन प्रवेश केला. घरातील महिलेला तसेच तिच्या मुलाला चाकू लावून आवाज करायचा नाही, गुपचूप बसायचे असा दम दिला. घरातील सामान अस्ताव्यस्त करून महिलेची ३० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची पोत, २४ हजार रुपये किमतीच्या अंगठ्या ,१ लाख २० हजार रुपयांची माळ, वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोन्याची पोत , ३५ हजार रुपये रोख असे २ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेले. डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, उदय बोरसे, प्रशांत पाटील, गणेश पाटील, विनोद सोनवणे, सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना बोलावण्यात आले. दीपक पाटील यांच्या पत्नीने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(६),३०५ ,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




