
समाजसेविका तसेच प्रसिद्ध गझलकारा ममता सिंधुताई सपकाळ यांचे प्रतिपादन…
अमळनेर(प्रतिनिधी):- माझी आई व समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे संस्कार,त्याग व समाजसेवा याच विचाराने आजही संस्थेची वाटचाल सुरू असून त्यांनी केलेल्या कार्याचे बळ आम्हाला नेहमीच चांगले कार्य करायला प्रवृत्त करत असून जगण्याच्या उणिवेतून समाजकार्याला आपोआप सुरवात होत असल्याचे प्रतिपादन समाजसेविका तसेच प्रसिद्ध गझलकारा ममता सिंधुताई सपकाळ (पुणे) यांनी केले.

येथील मराठा मंगल कार्यालयात मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब र. का.केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्यातर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे बुधवार (ता.२४) रोजी तिसरे पुष्प गुंफताना “हा खरा जीवनप्रवास” या विषयावर त्या बोलत होत्या.यावेळी भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जीवन पाटील, श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुभाष भंडारकर,अनुष्का डिजिटल चे संचालक मंगेश महिंद प्रमुख अतिथी होते.
यावेळी पुढे बोलतांना ममता सपकाळ यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.सिंधुताई सपकाळ अमळनेर ला येऊन गेल्यामुळे मला देखील अमळनेर ची ओढ लागली होती,व्याख्यानमालेच्या माध्यमातून ती पूर्ण झाली.यावेळी त्यांनी सांगितले की सिंधुताई यांनी जीवनात कधीच कुणाचा द्वेष,राग केला नाही, त्यांनी नेहमी सांगितले की एखाद्याला माफ करण्यासारखे सुख कशातच नाही.ज्या सिंधुताई सपकाळ यांनी बडनेरा रेल्वे स्टेशन वर भीक मागितली होती त्याच अमरावती च्या सिनेट वर त्याचं नाव घेतलं गेल, हीच त्यांच्या कार्याची पावती होती.माणसाचे शिक्षण नाहीतर संस्कार महत्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून नेहमी दाखविले.आजच्या काळात शिक्षणामुळे माणसाचे संस्कार हिरावत असल्याचे दिसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ममता सपकाळ यांनी “कसा धरू मी नेम तुझ्यावर, अजून आहे प्रेम तुझ्यावर… तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या, कसा करू मी क्लेम तुझ्यावर…”
यासह त्यांच्या इतर प्रसिद्ध गझल सादर केल्या.यावेळी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. सूत्रसंचालन प्रा.शीला पाटील यांनी केले तर बन्सीलाल भागवत यांनी आभार मानले.




