
हमाली करणाऱ्या तरुणाने दाखवलेल्या माणुसकीला अनेकांनी केला सलाम…
अमळनेर : घरातून रागात निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरी सुखरूप नेऊन तिचा सांभाळ करून अमळनेर पोलिसांच्या मदतीने तिला पालकांच्या स्वाधीन केल्याची माणुसकी एका हमाली करणाऱ्या तरुणाने दाखवल्याने हल्लीच्या जगातही चांगली माणसे जिवंत आहेत याचा प्रत्यय आला.

अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण समाजात इतके वाढले आहे की कायद्याचा धाक त्यांना राहिलेला नाही. पळवून नेणाऱ्या मुलांना देखील भीती वाटत नाही. दररोज अशा गैरप्रकारच्या घटना अथवा घरातून पळून गेलेल्या मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना घडत असताना मात्र तरुणाने मुलीला तिची काळजी घेत सुखरूप घरी नेले.
अमळनेर शहरातून एक १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडिलांशी भांडण करून जळगाव स्टेशनला निघू गेली. मूळचा नांदेड ता धरणगाव येथील आणि हल्ली जोलवा बारडोली येथे राहणार गिरीश सुकलाल पाटील (वय २१) हा टॅटू काढण्यासाठी जळगाव आला होता. तो परत जाताना त्याला परेशान झालेली ही मूलगी दिसली. सोशल मीडियावर बनलेल्या उत्तरांचल येथील मित्राला भेटायला ती जाणार होती मात्र त्यानेही तिच्याशी संपर्क तोडल्याने ती अधिकच अस्वस्थ होती. तिची सत्यता जाणून घेतल्यानंतर गिरिशने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने गिरीश ने तिला माझ्या घरी बारडोलीला चल तुझा राग शांत झाल्यावर तुझ्या घरी चल असे सांगितले. गिरीश हमाली करतो आणि त्याचे वडील सफाई कामगार आहेत. गरिबीची परिस्थिती असल्यावरही गिरिशने त्या बालिकेला घरी नेऊन तिला सांभाळले. एव्हढेच नव्हे तर सुरक्षेसाठी तो तिला त्याच्या आईजवळच झोपायला सांगत होता. गिरीश तिला वारंवार तिच्या आई वडिलांचा नंबर मागत होता मात्र ती देण्यास नकार देत होती.
इकडे अमळनेर पोलीस स्टेशनला मुलीच्या हरवल्याची नोंद करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तांत्रिक बाबींच्या साहाय्याने मुलीचा ठावठिकाणा मिळवला. पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, नितीन मनोरे,निलेश मोरे यांनी त्या मुलीला जोलवा (बारडोली) येथुन ताब्यात घेबून अमळनेर ला आणले. तिची समजूत घालत पालकांच्या ताब्यात दिले. गिरिशने तिच्या केसालाही धक्का न लागू देता तिला तीन दिवस सुरक्षित रित्या सांभाळल्याबद्दल मुलीचे पालक तसेच पोलीस अधिकाऱ्यांनीही त्याचे कौतुक केले.




