
उमेदवारांची घेतलेली परीक्षा फी परत करण्याचे निर्देश
अमळनेर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरती प्रक्रियेस स्थगिती दिली असल्याने उमेदवारांची घेतलेली परीक्षा फी परत करावी असे निर्देश जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी सभापती आणि सचिवांना २४ रोजीच्या पत्राद्वारे दिले आहे.

अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचाऱ्यांची गरज असल्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येत होती. त्यासाठी परिक्षा आयोजित केली होती. महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन व वस्रोद्योग विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी १९ मे रोजी राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकरभर्तीचे धोरण निश्चित होईपर्यंत भरतीला स्थगिती दिली होती. मात्र अमळनेर बाजार समितीत भरती प्रक्रिया सुरू असल्याच्या तक्रारी गावरान जागल्या सेनेचे विश्वासराव पाटील, निंबा पाटील यांच्यासह काही जणांनी केल्या होत्या. तसेच स्वप्निल बोरसे यांनी नोकर भरती स्थगित करून परीक्षा फी परत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दखल घेत जे उमेदवार परीक्षा फी मागतील त्यांना फी परत करा आणि भरती करू नये अन्यथा प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असा इशाराही पत्राद्वारे दिला आहे.




