
अमळनेर:- तालुक्यातील शहापूर येथील गौरेश्वर महादेव मंदिरावर 31 फुटांची त्रिशूल दान करून आपल्या मृत्युनंतर आयुष्यात कमविलेल्या पैशांचे अनोखे दान कै. पिरन भोमा पाटील यांनी केले आहे.

शहापूर परिसरातील धार्मिक स्थळ, गौरेश्वर महादेव मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कै. पिरन पाटील यांच्या मागे-पुढे कोणीच नव्हते. त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी गावातील मंडळींना सांगून ठेवले होते. “माझ्या मृत्यूनंतर उरलेले पैसे गौरेश्वर महादेवाला त्रिशूल दान करण्यासाठी वापरावेत.” त्यांच्या जवळ असलेले तीन लाख रुपयात दीड लाख रुपये माझ्या उत्तरकार्याला वापरा तर उरलेले दीड लाख रुपये मंदिरासाठी 31 फूटांचा त्रिशूल दान करण्यासाठी खर्च करण्यात यावा असा मानस त्यांनी बोलून दाखविला होता. कै. पिरन पाटील हे आध्यात्मिक आणि धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्त्व होते. गावातील कीर्तन सप्ताहात त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. समाजातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग नेहमीच उत्साहवर्धक राहिला. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे, त्यांनी जिवंतपणीच आपली सर्व इच्छा व मार्गदर्शन ग्रामस्थ मंडळांना स्पष्टपणे सांगून ठेवले होते.
ग्रामस्थांनी त्यांच्या इच्छेला मान देत, वाजतगाजत अंत्ययात्रा काढली, उत्तरकार्य पार पाडले आणि उरलेले पैसे मंदिरासाठी वापरून भव्य त्रिशूल दान करून बापूंच्या इच्छेला न्याय दिला. या कृतीमुळे गावकऱ्यांनी त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली. येथील योगेश पाटील व ग्रामस्थ मंडळांच्या मते, कै. पाटील यांनी केलेले हे प्रेरणादायी कार्य संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांच्या मनात कायमस्वरूपी तेजोमय राहील. या त्रिशूल दानामुळे केवळ धार्मिक स्थळाची शोभा तर वाढलीच आहे. मात्र समाजात श्रद्धा, सद्भावना आणि प्रेरणेचा अनमोल संदेश पोहोचला आहे. गावातील नागरिकांनी कै. पिरन भोमा पाटील यांच्या या उदार कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले असून, त्यांच्या कर्तुत्वाला व श्रद्धाभावाला सलाम ठोकला आहे.




