
अमळनेर ते निमपर्यंत दरवर्षी डागडुजी करण्यावरच भर, रस्त्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्याची मागणी…
अमळनेर :- तालुक्यातील कळमसरे -मारवड दरम्यान असलेला अवघा पाच कि.मी.रस्ता अक्षरशः उखडून गेला असून अवजड वाहतुकीमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गुडघ्यावर खड्डे पडले आहेत परिणामी यामुळे या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत आहेत. पूर्ण अमळनेर ते निम रस्त्यावर अवजड वाहनाच्या वापराने तीन तेरा झाले आहेत. खड्ड्यांची डागडुजी करण्यावरच दरवर्षी भर देण्यात येत असतो, मात्र पूर्ण रस्ता नवीन बनवण्याची गरज असून त्यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पाडळसरे धरणावर मुरूमाची आवश्यकता असल्याने खेडी येथून मुरूम वाहतूक सुरु आहे. नियम डावलून क्षमतेपेक्षा जास्त मुरूम अवजड डंपर मध्ये वाहतूक केली जात असल्याने रस्त्याची पुर्णतः चाळण झाली आहे.
खेडी, गोवर्धन, कळमसरे मार्गे पाडळसरे धरणावर मुरूमाची वाहतूक सुरु आहे. सकाळी सहा वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत लागोपाठ डंपरने मुरूम वाहतूक सुरु आहे. यात पाडळसरे धरणासाठी लागणारा मुरुमाला ग्रामस्थांचा विरोध नसून क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोडने डंपरमधून मुरूमाची वाहतूक सुरु आहे.त्यामुळेच रस्त्याचा दुतर्फा व मधोमध देखील खड्डे पडले आहेत. दुसरीकडे कळमसरे पासून पाच कि.मी. मारवड जाण्यासाठी अवघे पाच मिनिटांचे अंतर सद्यस्थितीत वीस ते पंचवीस मिनिटांचा अवधी लागत आहे. अनेकांना तर रस्त्यावरील खड्यांमुळे कंबरेचा, मणक्यांचा विकार देखील लागण्याचे बोलले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील बघ्याची भूमिका घेत कानावर हात व तोंडावर बोट ठेवल्याचे चित्र आहे. वाहन चालवताना दुचाकी व चार चाकी धारकांना मोठी कसरत करावी लागत असून,खड्डे चुकविताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचा अख्यत्यारीत येणारा हा रस्ता दुरावस्थेमुळे सद्या शेत शिवार रस्ता बनल्याचे दिसून येत आहे.
या रस्त्यावर जास्तीत- जास्त पंधरा टन वजनापेक्षा जास्त वाहतूक होऊ नये याची काळजी घेतली गेली पाहिजे मात्र गेल्या चार महिन्यांपासून चाळीस ते पन्नास टन पेक्षा जास्त अवजड वाहतूक सुरु आहे. यात महसूल यंत्रणासह सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे लावून बसले आहे.
अवजड वाहतुकीने सुसाट धावणारी डम्परंवर नियंत्रण आणून,रस्तावरील दिसेनासे झालेले डांबरीकरण पुन्हा दर्जेदार करून,भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तसदी घ्यावी व लोकप्रतिनिधींनी देखील नूतनीकरणाचे काम करण्यासाठी निधी मंजुरी मिळवावी अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.
प्रतिक्रिया…
अवजड वाहतुकीबाबत संबंधिताना पत्र व्यवहार करण्यात आला असून तात्काळ अवजड वाहतूक थांबवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावा असे पत्रात सांगितले आहे.
विजय गांगुर्डे – उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर




