
अमळनेर : शासनाने कागदपत्रांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्र आता मुद्रांकावर घेऊ नये असे आदेश काढलेले असताना देखील सेतू चालक आणि मुद्रांक विक्रेते विद्यार्थी ,पालक व नागरिकांकडून मुद्रांकवर प्रतिज्ञापत्र घेत आहेत. ते तात्काळ बंद करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी बैठकीत दिला.

शासनाने विविध कागदपत्रे अथवा दाखल्यांसाठी मुद्रांक ऐवजी साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र चालेल असे नियम केलेले आहेत. मात्र अमळनेर तालुक्यात सेतू चालक आणि मुद्रांक विक्रेते यांनी संगनमत करून आपल्या व्यवसायासाठी मुद्रांक वर प्रतिज्ञापत्र सक्तीचे केले होते. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. तहसीलदार सुराणा यांनी मुद्रांक विक्रेते आणि सेतू चालक यांची बैठक घेऊन साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र घ्यावे असे आदेश दिले आहेत. आदेशाची अमलबाजवणी न झाल्यास अथवा तक्रारी प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.
त्याचप्रमाणे बऱ्याचवेळा सेतू चालकांकडून बनावट दाखले प्रस्तावसोबत जोडले जातात. असे प्रस्ताव आधी परत पाठवत होतो मात्र आता ते प्रस्ताव परत न पाठवता रद्द केले जातील. नवीन प्रस्तावसाठी लागणारा पैसे याचा भुर्दंड लागल्यास सेतू चालक आणि ग्राहक जबाबदार राहतील असेही स्पष्टपणे सांगण्यात आले.





