
कारवाई शून्य, आंधळ दळतंय कुत्र पीठ खातंय अशी महसूलची अवस्था…
अमळनेर :- तालुक्यातील हेडावे सारबेटे शिवारात मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन सुरू असून हजारो ब्रास मुरूम वाहून नेला जात आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी खाणपट्टा मंजूर नसताना ही मोठ्या प्रमाणावर मुरूम उत्खनन करण्यात आले असून महसूलचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या आधी तालुक्यात गलवाडे शिवारात मोठ्या प्रमाणावर मुरूम उत्खनन करण्यात आले होते, त्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तिथून मुरुम काढणे बंद करण्यात आले. त्यावेळी ही महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई झाल्याचे ऐकवत नाही. मात्र आता त्या बाजूने उत्खनन थांबून हेडावे सारबेटे शिवारात जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जात आहे. रोज 20 ते 25 डंपर ने तो मुरूम दोन ठिकाणी रस्त्यांच्या कामासाठी नेला जात आहे. मात्र या ठिकाणी खाणपट्टा मंजूर नसतानाही मुरुमाचे उत्खनन कसे होते याचे कारण गुलदस्त्यात असून महसूलचे अर्थपूर्ण दुर्लक्ष हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
गौण खनिज लुटीच्या सोईसाठी शोधला अनोखा उपाय…
तालुक्यात अनेक ठिकाणी असलेल्या टेकड्या मुरूम व डबर काढून सरसपाट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी झाली आहे. काही गावात वीस – पंचवीस नागरिकांची सही घेत ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन गाव शिवार रस्त्यासाठी मुरूम काढण्यास परवानगी घेतली जाते. मात्र तो मुरूम इतरत्र मोठ्या मोठ्या कामांसाठी वापरला जातो. हेडावे सारबेटे शिवारात ही असाच प्रकार असल्याची शक्यता असून यात अनेकांचे हात रंगले आहेत.
अधिकारीच शासनाच्या नियमांची पायमल्ली करत असून शासनाच्या जीआर प्रमाणे कारवाई न करता फक्त दंड भरून राजरोसपणे वाहने सोडून दिले जात आहेत. त्यांच्या अभयामुळे तालुक्याचे गौण खनिज ओरबाडण्याचा हा डाव सुरू आहे यात लोकप्रतिनिधी ही चिडीचूप असल्याने त्यांचे प्यादे हि सुसाट सुटले आहेत. त्यामुळे भविष्यात वाळू मुरूम माफिया तालुक्यावर राज्य करतील व त्यांच्या सोयीचे व पाठीचा कणा नसलेले अधिकारी येऊन बसवतील यात शंका नाही.




