
शेतकऱ्यांची थट्टा, गावरानी जागल्या सेनेचे बाजार समितीस पत्र
अमळनेर:- अतिवृष्टीसारख्या संकटांना तोंड देत मोठ्या मेहनतीने उत्पादित केलेला मका शेतमाल अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येत असून, शेतकऱ्यांना अतिशय अल्प दर मिळत असल्याचे दिसून आले आहे.
दिनांक ८ ऑक्टोबर रोजी विक्रीस आलेल्या मका शेतमालाला केवळ रुपये ११०० ते १५०० प्रती क्विंटल असा दर मिळाला असून, सरासरी दर रु. १३०० प्रती क्विंटल एवढा ठरला आहे. शासनाने निश्चित केलेला मका खरेदी दर रु. २४०० प्रती क्विंटल असल्याने शेतकऱ्यांना तब्बल अर्ध्या दरात शेतमाल विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गावरानी जागल्या सेना संघटनेचे अध्यक्ष विश्वास पाटील तसेच अमळनेर तालुका युवा काँग्रेस अध्यक्ष यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव व संचालक मंडळ यांना पत्राद्वारे शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, शेतकऱ्यांच्या मका शेतमालातील आद्रतेची अचूक मोजणी करून तुलनात्मक दर निश्चित करावा व त्यानुसार योग्य भाव देण्यात यावा. शेतकऱ्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊन त्यांची लूट थांबविणे ही बाजार समितीची जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बाजार समितीने या गंभीर मुद्द्याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
बाजार समितीत ओला माल येत असल्याने त्याला सुकवून घट लागते त्यामुळे आद्रता तपासून भाव दिले जात आहेत. शिवाय सरकारी हमी भाव केंद्र सुरू न झाल्याने बाजार समितीत भाव मिळत आहे. – उन्मेष राठोड, सचिव बाजार समिती




