
अमळनेर : येथील डीवायएसपी आणि अमळनेर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने जळोद येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून चार आरोपीना पकडून त्यांच्याजवळील रोख रक्कम ,मोबाईल आणि ९ मोटरसायकली असा एकूण २ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
७ रोजी डीवायएसपी विनायक कोते यांनी हेडकॉन्स्टेबल प्रमोद बागडे , गणेश पाटील ,हितेश बेहरे , शेखर साळुंखे , सुनील जाधव ,विजय भोई ,राहुल पाटील यांना बोलावून सांगितले की जळोद शिवारात पातोंडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पत्त्यांचा जुगार खेळला जात आहे. पथकाने सायंकाळी छापा टाकला असता सोमा मच्छीन्द्र वैदू यांच्या घराच्या मागे मोकळ्या जागेत काही जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसानी त्यांना ताब्यात घेतले. युवराज शिवराम कोळी (वय ४५) , सागर युवराज कोळी (वय २६),सुनील अर्जुन साळवे (वय ४६) , गणेश आधार कोळी (वय ५२) सर्व रा जळोद अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याजवळील रोख रक्कम , मोबाईल आणि घटनास्थळी नऊ मोटारसायकली असा एकूण २ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चारही आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




