
स्थानिक प्रशासन फेल ठरल्याने आता नूतन जिल्हाधिकाऱ्यांकडून अवैध वाळूप्रश्नी कारवाईची अपेक्षा…
अमळनेर:- दोन तालुक्यांना जोडणाऱ्या राज्यमार्गावरील
जळोद-बुधगाव पुलाला वाळू उपश्यामुळे धोका निर्माण झाला असून काही गंभीर दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का ? असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत.
तापी नदीपात्रातून सुरू असलेला अवैध वाळू उपसा दिवसेंदिवस वाढत असून या बेकायदेशीर उपश्यामुळे जळोद-बुधगाव पुलासह नदीकाठावरील भागाला धोका निर्माण झाला असून, स्थानिक प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसत आहे. स्थानिक प्रशासनाकडून बड्या माश्यांवर कारवाई होत नसल्याने हे वाळू चोर अधिकच मुजोर बनले आहेत. या अनधिकृत उपशामुळे पुलाच्या पायाजवळ खोल खड्डे तयार झाले आहे. त्यामुळे पुलाच्या स्थैर्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे ही दुर्लक्ष होत असून महसूल प्रशासन तर गाढ झोपेत आहे. या वाळूच्या खड्ड्यांमुळे पुलाला धोका निर्माण होऊन दुर्घटना घडल्यास स्थानिक प्रशासनावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.
नूतन जिल्हाधिकाऱ्यांकडून तालुक्यातील वाळूप्रश्नी लक्ष घालण्याची अपेक्षा…
स्थानिक प्रशासन अपयशी ठरले असल्याने आता नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी रोहन घुगे स्वतः पुढाकार घेऊन वाळू माफियांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आधीच्या जिल्हाधिकारी यांचा कार्यकाळ स्वतःची प्रसिद्धी करण्यात व नेत्यांच्या मागेपुढे करण्यात गेल्याने काम कमी व चमकोगिरी जास्त झाल्याची टीका अनेकदा करण्यात आली होती. मात्र नूतन जिल्हाधिकारी नव्या दमाचे असल्याने आता अनेकांना त्यांच्याकडून वाळू प्रश्नी कडक कारवाईची अपेक्षा आहे.
त्रिकुटाने तापी पोखरली…
तालुक्यातील निलेश, योगेश व गणेश नामक त्रिकूट सध्या डंपरने तापी नदी पोखरत असून अकबरच्या नावाने या गणेश नामक दुसऱ्या तालुक्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचे चांगभले होत असल्याची जोरदार चर्चा आहे. दुसऱ्या तालुक्यात बदली करून गेल्यानंतर ही कुंपणाने शेत खाण्याचे धंदे सोडले नसून इतके खाऊन कुठे टाकणार हा खरा प्रश्न असला तरी नीतिमत्ता गहाण टाकून काम करणाऱ्याचे कधीही चांगभले होत नसते हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.




