
अमळनेर:- शहरात वाळू वाहतूक बिनदिक्कत सुरू असून काल तर प्रांताधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरून संध्याकाळच्या सुमारास वाळूचे ट्रॅक्टर आणि डंपर सर्रासपणे सुरू होते.

अवैध वाळू वाहतुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर तीन दिवस वाळू वाहतूक बंद ठेवण्याच्या तोंडी कलेक्शन एजंट मार्फत वाळू माफियांना देण्यात आल्या होत्या मात्र तरीही स्वतः कलेक्शन एजंटचे डंपर रात्रभर सुरू होते. या कलेक्शन एजंटवर वरदहस्त असल्यामुळे तो बिनधास्त असून बिनदिक्कतपणे वाळू वाहतूक करत आहे. त्याचे अनुकरण इतर जण करत असून काल संध्याकाळी प्रांताधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरूनच डंपर आणि ट्रॅक्टर वाळू वाहून नेत होते. सध्या ऑर्डर कमी असल्याने गलवाडे रस्त्यावर ठिय्या मारत वाळूचा साठा केला जात आहे. व मागणीनुसार शहरात वाळूचा पुरवठा केला जात आहे. ही सर्व ठिकाणे पत्रकारांना माहित होतात, पण महसूलला माहित होत नाहीत हे आश्चर्याची बाब आहे किंवा माहित असूनही कारवाई करायची इच्छा नसल्याने वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. आता नद्या खाली केल्याशिवाय किंवा प्रशासनात बदल झाल्याशिवाय वाळू वाहतूक थांबणार नाही, अशी विदारक परिस्थिती अमळनेर तालुक्यात निर्माण झाली आहे.




