
अमळनेर : नगरपालिका निवडणूक मतदार याद्यांवर एकूण ३४५८ हरकती प्राप्त झाल्या आहेत. पालिका कर्मचारी ऐन दिवाळीच्या सुट्टीत देखील स्थळ निरीक्षण करून पडताळणी करीत आहेत.
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या बनवतांना अनेक मतदारांची नावे प्रभागांमध्ये इकडून तिकडे गेल्याने राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. १८ प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी तातडीने हरकती घेतल्या आहेत. १७ तारखेपर्यंत हरकतींची मुदत वाढवल्यानंतर हरकतींची संख्या दुप्पट झाली. एकूण ३४५८ हरकती प्राप्त झाल्या आहेत. पालिकेला पडताळणी करून अहवाल उपविभागीय अधिकारी यांना सादर करायचा आहे आणि ३० ऑक्टोबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मुखायधिकारी तुषार नेरकर यांनी दोन कर्मचाऱ्यांचे एक याप्रमाणे १८ वार्डाचे १८ पथक स्थळ निरीक्षणकरीता नेमले आहेत. प्रत्येक पथकावर एक पर्यवेक्षक नियंत्रण ठेवत आहेत. ज्या ज्या नावाची हरकत घेण्यात आली आहे त्या जागेवर कर्मचारी जाऊन खरोखर मतदार कोणत्या वार्डात राहतो याची खात्री करून तसा अहवाल सादर करणार आहेत. त्यानुसार याद्या दुरुस्त केल्या जातील.
दिवाळीच्या सुट्टीत देखील कर्मचारी स्थळ निरीक्षण करीत आहेत. मी स्वतः देखील काही ठिकाणी फिल्डवर जाऊन खात्री केली आहे. उपविभागागीय अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.- तुषार नेरकर , मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद




