
मात्र अमळनेर आणताना दोन आरोपी बेड्यांसह पोलिसांच्या वाहनातून उतरून झाले फरार
अमळनेर : पहुर व अमळनेर तालुक्यातून गुरे चोरणाऱ्या जळगावच्या आरोपीना अमळनेर आणत असताना दोन आरोपी बेडयांसह पोलिसांच्या वाहनातून उतरून फरार झाल्याची घटना २२ रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास कुऱ्हे अंडरपास बोगद्यात घडली.
अमळनेर तालुक्यातून लोणे आणि पिंपळे येथून सात गुरे चोरी झाली होती. त्याचा शोध स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस संदीप पाटील , प्रवीण मांडोळे ,हरीलाल पाटील, राहुल कोळी करीत असताना त्यांना जवखेडे येथे मोटरसायकल एम एच १९ बी बी ५१९८ बी ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये गुरे चोरी मध्ये दिसून आली. पोलिसांनी तांत्रिक माहितीवरून मालक शोधला असता अकील कादिर पिंजारी रा आझाद नगर पिंप्राळा असे समजले. पोलिसांनी त्यांना २२ रोजी दुपारी दोन वाजता ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचे साथीदार शाकीर शाह अरमान शाह वय ३० रा सुप्रीम कॉलनी जळगाव , अमजद शेख फकीर कुरेशी वय ३५ रा अशोक किराणा जवळ मेहरूण , आफताब आलम शेख रहीम रा नशिराबाद जळगाव , व तौसिफ शेख नबी रा फातिमा नगर जळगाव यांच्यासोबत अमळनेर तालुक्यात सात आणि पहुर येथे तीन गुरे चोरी केल्याचे कबुल केले आणि चोरीत त्यांनी पिकअप वाहन क्रमांक एम एच १९ सी व्ही ७१६९ वापरल्याचे सांगितले. पैकी चार जणांना ताब्यात घेतले आणि तौसिफ शेख नबी हा घरी मिळून आला नाही. आरोपीना स्पॉट व्हेरिफिकेशन साठी २२ रोजी रात्री शासकीय वाहनाने आणत असताना त्यातील शाकीर शाह अरमान शाह व अमजद शेख फकीर कुरेशी याना बेड्या घालून मागच्या सीट वर बसवले होते. अमळनेर जवळ कुऱ्हे रेल्वे अंडर पास बोगद्यात वाहन आल्यानन्तर मागच्या सीट वरून दोघे जण उतरून पळून गेले. पोलिसांना कळताच त्यांनी आजूबाजूला शोध घेतला मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पिकात लपून गेले. अखेरीस इतर दोन आरोपीना पकडून पोलिसांनी अमळनेर पोलीस स्टेशनला आणले. दोघा फरार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.




