
वड चौकातील प्रताप,आबालवृद्धांना होतोय विनाकारण त्रास
अमळनेर:-कोणताही परवाना नसताना अवैध वाळू चोरी करून शासनाचा महसूल बुडवायचा आणि सोबतच मनोरंजन आणि विकृत आनंद घ्यायचा म्हणून मध्यरात्री फटाक्यांचा बार उडवायचा असला विकृत प्रकार सध्या वड चौकात काही अवैध वाळू वाहतूकदारांकडून घडत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
वाळूची अवैध वाहतूक करणारी मंडळी रात्री उशिरापर्यंत वड चौकात बऱ्याच बसून असतात. याठिकाणी बसण्या इतपत ठीक आहे परंतु या दिवाळीत या महाभागांनी मध्यरात्री मोठ्या आवाजात फटाक्याचे बार उडविण्याचे उद्योग हाती घेतले असून अचानक होत असलेल्या आवाजामुळे परिसरातील आबाल वृद्ध व लहान बालके दचकून उठत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून संबंधित लोकांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.दरम्यान काही नागरिकांनी त्यांना हटकले असता सदर लोकांच्या अंगावर धावून जाणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, धमक्या देणे असे प्रकार घडले आहेत.अशा परिस्थितीत मोठा वाद उदभवण्याची शक्यता असल्याने याकडे पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
फटाके फोडण्यावरून मोठा वाद…
तालुक्यातील कळमसरे गावात फटाके फोडण्यावरून दोन गटात मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र गावातील मान्यवरांनी घेतलेल्या सामंजस्याचा भूमिकेमुळे गुन्हे दाखल न होता गावातल्या गावात वाद मिटवण्यात आला होता. शहरात रात्री बेरात्री सार्वजनिक ठिकाणी व मुख्य रस्त्यावर फटाके फोडून प्रवाश्यांना त्रास होईल असे कृत्य टवाळखोराकडून केले जात असून त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.




