
अमळनेर :- गावातील भांडण सोडवल्याचा राग आल्याने तालुक्यातील पिंगळवाडे येथे चौघांनी तिघांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २१ रोजी सकाळी पिंगळवाडे येथे नवल साहेबराव पाटील आणि दीपक विठ्ठल देशमुख, विठ्ठल केशव देशमुख यांच्यात सांडपाण्यावरून भांडण झाले होते. फिर्यादी विजय पोपट देशमुख (वय ६५) यांनी मध्यस्थी करत ते भांडण सोडवले होते. २२ रोजी सकाळी ८ वाजता विजय देशमुख हे किराणा दुकानावर गेले असता त्याठिकाणी अमोल विठ्ठल देशमुख याने फिर्यादीचा गळा पकडत जीवे मारण्याची धमकी दिली. दीपक विठ्ठल देशमुख याने फिर्यादीच्या छातीवर बसून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीला सोडवण्यासाठी त्यांची पत्नी मंदाबाई देशमुख व भाऊ सुरेश देशमुख हे आले असता त्यांना ही मारहाण करण्यात आली. गावातील लोकांनी त्यांची सोडवणूक केली. याप्रकरणी मारवड पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




