
अमळनेर : गुरे चोरणाऱ्या आरोपींना अमळनेर आणत असताना दोन आरोपी बेडयांसह पोलिसांच्या वाहनातून उतरून फरार झाल्याप्रकरणी आता एलसीबीच्या चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यातून लोणे आणि पिंपळे येथून सात गुरे चोरी झाली होती. त्याचा शोध स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील, राहुल कोळी यांनी अकील कादिर पिंजारी (रा आझाद नगर पिंप्राळा), शाकीर शाह अरमान शाह (वय ३० रा सुप्रीम कॉलनी जळगाव), अमजद शेख फकीर कुरेशी (वय ३५ रा अशोक किराणा जवळ मेहरूण), आफताब आलम शेख रहीम (रा नशिराबाद जळगाव), या चार जणांना ताब्यात घेतले. आरोपीना स्पॉट व्हेरिफिकेशन साठी २२ रोजी रात्री शासकीय वाहनाने आणत असताना त्यातील शाकीर शाह अरमान शाह व अमजद शेख फकीर कुरेशी याना बेड्या घालून मागच्या सीट वर बसवले होते. अमळनेर जवळ कुऱ्हे रेल्वे अंडर पास बोगद्यात वाहन आल्यानंतर मागच्या सीट वरून दोघे जण उतरून पळून गेले. पोलिसांना कळताच त्यांनी आजूबाजूला शोध घेतला मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पिकात लपून गेले. त्यामुळे पोलिसांची नामुष्की झाल्याने पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेत कर्तव्यात कसूर केल्याचे कारण दाखवत चार पोलिसांना निलंबित केले आहे.




