
अमळनेर: तालुक्यातील पाडसे गावाजवळ स्विफ्ट गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेतील जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याप्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील चौबारी येथील हिंमत नामदेव कढरे हे २२ रोजी कामानिमित्त चौबारी येथून पाडसे येथे जात असताना समोरून येणाऱ्या स्विफ्ट कार (क्रमांक एमएच ०५ सिव्हि ५६८२) वरील चालकाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला, पायाला व तोंडाला दुखापत झाली होती. त्यांच्या मुलाने व इतरांना त्यांना उपचारासाठी अमळनेर येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना धुळे येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांच्यावर धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २४ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मयताचा मुलगा सागर कढरे याने दिलेल्या फिर्यादीवरून स्विफ्टचालक राजेंद्र पुंडलिक पाटील याच्या विरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ मुकेश बडगुजर हे करीत आहेत.




