
अमळनेर:- येथील जिल्हा परिषद ढेकू खुर्दचे प्राथमिक शिक्षक व कवी डॉ. कुणाल पवार यांची “माय-बाप” ही कविता गुजरात राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन महामंडळाने इयत्ता ७ वी च्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात समावेशित केली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार तयार झालेल्या सन २०२५-२६ पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमात ह्या कवितेचा समावेश पुढील दहा वर्षांसाठी सदर पाठ्यपुस्तकात राहणार आहे. डॉ. कुणाल पवार यांचे याआधी दोन पुस्तक प्रकाशित असून ते महाराष्ट्र राज्याच्या पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती पुणे येथे देखील भूगोल विषय सदस्य म्हणून काम पाहतात. ते अहिराणी मराठी कविता, बालकविता व गझल प्रकारात लिखाण करतात. त्यांच्या कवितेच्या गुजरात राज्याच्या इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकात मराठी विषयातील निवडी बद्दल जिल्हा परिषद शिक्षण विभाग जळगाव व परिसरातून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.




