
अमळनेर: तालुक्यातील चौबारी येथे शेतात कापूस वेचताना साप चावल्याने २७ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना ३१ रोजी घडली आहे.
३१ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास चौबारी येथील जिजाबाई रवींद्र महाले (वय २७) ही महिला दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर कापूस वेचणीचे काम करत तिच्या पायाला साप चावला. शेतात असलेल्या दोघांनी तिला दुचाकीवर बसवून गावात आणले. त्यानंतर तिची प्रकृती जास्तच खराब होत असल्याने विजय पाटील व इतरांनी तिला खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान जिजाबाईचा मृत्यू झाला. तिला दोन लहान मुले असून पतीही रोजंदारीवर कामाला जातो. तरुण विवाहितेच्या मृत्यूमुळे गावपरीसरात हळहळ व्यक्त होत आहे. विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे करीत आहेत.
प्रतिक्रिया…
अतिपावसामुळे साप निघण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे सर्पदंशाचे रुग्ण ही वाढले आहेत. शेतकरी व मजूर वर्गाने शेतीची कामे करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शेतातील ओलसर जागा, बांध, गवताखालील भाग, तसेच अडचणीच्या साप लपण्याची शक्यता अधिक असते.
– डॉ. जी. एम. पाटील, अमळनेर ग्रामीण रुग्णालय




