
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरची तहसीलदारांकडे तक्रार
अमळनेर : दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे तहसील कार्यालयात भेट देऊन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्याकडे प्रतिज्ञापत्रासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरची सक्ती करण्यात येत असल्याबाबत तक्रार नोंदविण्यात आली.
ग्राहक पंचायत प्रतिनिधींनी सांगितले की शासनाच्या नियमांनुसार शासकीय, निमशासकीय तसेच शैक्षणिक कामकाजासाठी प्रतिज्ञापत्र कोऱ्या कागदावर स्वयंघोषणापत्राच्या स्वरूपात सादर करता येते. मात्र काही कार्यालयांमार्फत नागरिकांना व विद्यार्थ्यांना शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र घेण्याची सक्ती करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या बाबतीत तहसीलदार सुराणा यांनी तत्काळ दखल घेत संबंधित कार्यालयांशी दूरध्वनीवर संपर्क साधून कोऱ्या कागदावर स्वयंघोषणापत्र स्वीकारावे आणि फक्त न्यायालयीन कामांसाठीच स्टॅम्प पेपर आवश्यक आहे असे निर्देश दिले. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्राहक, नागरिक तसेच विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरच्या वतीने प्रांत कार्यकारिणी सदस्य अॅड. भारती अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष सतीश देशमुख, जिल्हा उपसचिव मकसूद बोहरी, तसेच तालुका पदाधिकारी सुनील वाघ, विजय शुक्ला, ज्योती भावसार, महेश पाटील, भाऊसाहेब देशमुख, जेष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर व दिलीप सारजे उपस्थित होते.ग्राहक पंचायत तर्फे मेहराज बोहरी यांनी तहसीलदारांनी केलेल्या तातडीच्या कारवाईबद्दल आभार मानले.




