
अमळनेर : एलसीबी पोलिसांच्या तावडीतून बेडयांसह फरार झालेला दुसरा आरोपी दोंडाईचा येथे सापडला असून त्याला अमळनेर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून दोन्ही आरोपींना ४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुरे चोरी प्रकरणात जळगाव येथून चार संशयितांना अमळनेर येथे आणत असताना कुऱ्हे अंडरपास बोगद्यात दोघांनी गाडी हळू झाल्याचा फायदा घेत बेडयांसह गाडीतून उडी मारून पळ काढला होता.
अमजद फकिरा कुरेशी (रा. मेहरूण, जळगाव) याला दिल्ली येथून अटक करण्यात आली होती. तर दुसरा आरोपी शाकीर शाह अरमान शाह हा तेथून सटकला आणि अजमेर येथे असल्याची माहिती तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे एलसीबी पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर होते. तेथून तो सुरत पळाला आणि सुरतहून येताना त्याला दोंडाईचा येथे पकडण्यात आले. पोलिसांनी दोन्ही फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अमळनेर पोलीसांच्या ताब्यात दिले. दोघांना न्यायालयाने ४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.




