
दुरूस्तीबाबत रेल्वे बांधकाम प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकमेकांकडे बोट…
अमळनेर : शहराच्या मारवड रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते जीवघेणे ठरत आहेत. दुरुस्तीसाठी नागरिकांनी पाठपुरावा केला असता रेल्वे बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत धन्यता मानत आहेत. लोकप्रतिनिधींचे ही याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.
मारवड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा मध्यभाग हा रेल्वेच्या बांधकाम विभागाने बांधला असून त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी रेल्वेच्या बांधकाम विभागावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जाते. मात्र, या विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. या पुलाच्या पलीकडे प्रताप कॉलेज असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींना याच रस्त्याने ये-जा करावी लागते. तसेच धार, मारवड व इतर पंधरा गावांना जाण्यासाठी हीच वाट आहे. मात्र उड्डाणपुलावरून जाणाऱ्या प्रवाश्यांना व विद्यार्थ्यांना खड्ड्यांमधून वाट काढताना त्यांचा जीव मुठीत धरावा लागत आहे. वाहन चालकांना खड्ड्यांमुळे वाहने चुकवत चालवावी लागत असून यामुळे अपघाताची शक्यता प्रचंड वाढली आहे. चारचाकी, दुचाकी, ट्रक आदी वाहने मोठ्या प्रमाणात या पुलावरुन वाहतूक करतात. मात्र, खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो आणि वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने ते अधिक धोकादायक ठरत आहेत. अनेक वाहनचालकांनी आणि स्थानिकांनी तक्रारी करूनही अद्याप प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे बांधकाम विभाग दुरुस्तीची जबाबदारी घेत नसून एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. एखादा मोठा अपघात घडून गेल्यावरच प्रशासन व लोकप्रतिनिधी खडबडून जागे होणार का ? असा सवाल आता प्रवाशांकडून विचारला जात आहे.
प्रतिक्रिया…
उड्डाणपुलावर मध्यभाग हा रेल्वेच्या हद्दीत असून त्यांनीच त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे, त्याबाबतचे पत्र कार्यालयीन वेळेत पाहून योग्य कार्यवाही केली जाईल.
– सुभाष राऊत, कार्य. अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर
प्रतिक्रिया…
पुलावरील मध्यभागाचे बांधकाम जरी रेल्वे प्रशासनाने केले असले तरी दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी याबाबत दोन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
– पंकज झाडेकर, अभियंता रेल्वे बांधकाम विभाग




