
जल व मृदा संधारण, शाश्वत शेती व गट व्यवसायांचे प्रत्यक्ष दर्शन
अमळनेर- तालुक्यातील खोकरपाठ येथील शंभू महिला शेतकरी गट यांच्या गट शेतीतून करण्यात आलेल्या जल व मृदा संधारण तसेच शाश्वत शेतीविषयक विविध उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील ११ गावांतील शेकडो महिला शेतकऱ्यांनी अभ्यासभेट दिली.
ही भेट राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था, अमळनेर यांच्या माध्यमातून आय.डब्ल्यू.एम.पी. (IWMP) योजनेच्या कार्यक्षेत्रांतर्गत आयोजित करण्यात आली होती. भिलाली, एकतास, एकलहरे, पाडसे, तांदळी, शहापूर, खेडी, खर्दे, वासरे, निंब व कळमसरे या गावांतील महिला शेतकरी या अभ्यासभेटीत सहभागी झाल्या.
खोकरपाठ येथील शंभू महिला शेतकरी गटाने सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धामध्ये सहभाग घेत, गेल्या दोन वर्षांपासून विषमुक्त कापूस व मका पीक उत्पादनासाठी नॅचरल पेस्ट मॅनेजमेंटचा यशस्वी वापर केला आहे. गटाच्या माध्यमातून गांडूळखत निर्मिती व्यवसाय, टोकण यंत्र व कृषी अवजार भाडेतत्त्वावर देण्याचा उपक्रम, वृक्षारोपण तसेच जल व मृदा संधारणाची विविध कामे सातत्याने केली जात आहेत.
या अभ्यासभेटी दरम्यान गटातील संगीता पाटील, रेखा पाटील व सुलभा पाटील यांनी उपस्थित महिलांना गट शेतीच्या कार्यपद्धतीबाबत तसेच पाणी फाउंडेशनच्या गट शेती उपक्रमांतर्गत अमळनेर टीमच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
या भेटीद्वारे महिलांना शाश्वत शेती, गटशेतीचे फायदे व जल-मृदा संवर्धनाच्या कामांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करून आपल्या गावांमध्ये अशा प्रकारचे प्रयत्न राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.




