
अमळनेर :- तालुक्यातील मुडी येथील रहिवाशी आणि ऍटलस स्किलटेक विद्यापीठ, मुंबई येथील तंत्रज्ञान ज्ञानशाखेचे संचालक व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शशिकांत पाटील यांना इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (IET), युनायटेड किंगडम यांचे अत्यंत प्रतिष्ठित फेलो सदस्यत्व (FIET) प्रदान करण्यात आले आहे. हा सन्मान ३ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला.
IET फेलोशिप हे जागतिक स्तरावरील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च मान्यता मानले जाते. सन १८७१ मध्ये स्थापन झालेल्या आणि १९२१ मध्ये रॉयल चार्टरद्वारे मान्यता मिळालेल्या या संस्थेचे फेलो सदस्यत्व मिळवणे अत्यंत कठीण आहे. या सदस्यत्वासाठी अत्यंत कडक नियम आणि निकष आहेत, त्यामुळे भारतात आणि जगभरात फक्त काही निवडक अभिजात अभियंते आणि शैक्षणिक तज्ञांनाच हा सन्मान मिळतो. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील फार कमी व्यक्तींना हे फेलोशिप प्राप्त होते.
डॉ. पाटील यांनी सांगितले की, “२०२० मध्ये मी पहिल्यांदा या फेलोशिपसाठी अर्ज केला होता, परंतु तो नाकारण्यात आला. मात्र ऍटलस स्किलटेक विद्यापीठाच्या कुलपती आणि संस्थापक अध्यक्ष डॉ. इंदु शहाणी यांच्या अनुमोदन पत्रामुळे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी पुन्हा प्रयत्न केला आणि यशस्वी झालो.”
डॉ. पाटील यांनी ऐटलस स्किलटेक विद्यापीठाच्या संपूर्ण नेतृत्वाचे आभार मानले. डॉ. इंदु शहाणी- कुलपती आणि संस्थापक अध्यक्ष, सिद्धार्थ शहाणी – कार्यकारी अध्यक्ष, प्रा. हिना ठक्कर- प्रो-व्हाईस चांसलर, कुलगुरू, रजिस्ट्रार आणि मानव संसाधन संचालक यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे हे यश साध्य झाले आहे.
डॉ. पाटील यांनी सांगितले की, “हा सन्मान केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून ऍटलस स्किलटेक विद्यापीठाच्या उत्कृष्टतेचा आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचा परिणाम आहे. मी या फेलोशिपचा उपयोग विद्यापीठासाठी अधिक संशोधन संधी, उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी करीन.”
इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (IET) ही १८७१ मध्ये स्थापन झालेली जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्था आहे. संस्थेचे जगभरात केवळ ७,३०० फेलो सदस्य आहेत जे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत आहेत.




