
अमळनेर – शहरातील बोरी नदीवरील पूल बांधून सात वर्षे होऊनही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. या पुलाच्या बाहेर पडायला जागा घ्यावी लागणार आहे. मात्र, ही जागा वफ्फ बोर्डाची आहे की बोहरा समाजाची यामुळे संभ्रम कायम आहे. यामुळे पूल बांधून सात वर्षे उलटली तरी त्याचा वापर होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
गांधलीपुरा भागात राज्य मार्ग सहा दाखवून बोरी नदीवर साडेसात कोटी रुपयांचा पूल बांधण्यात आला. या पुलावरून बाहेर पडायला मार्गच नाही. यामुळे हा पूल कुचकामी ठरत आहे. २०१८ मध्ये या पुलाचे काम पूर्ण झाले
आहे. या पुलावरून बाहेर पडताना बोहरा समाजाची जागा अडथळा ठरत आहे. अखेरीस बोहरा समजाने ही जागा
बांधकाम विभागाला देऊ केली. २०२१ मध्ये या पुलावरून बाहेर पडायला मार्ग काढण्यासाठी दोन कोटी रुपयांची
तरतूद करण्यात आली. पुलावरून बाहेर पडणारा मार्ग पुढे राज्य मार्ग १५ला जोडण्यात येणार होता. बोहरा समाजाची जागा सरळ खरेदीने घेण्याचे ठरविण्यात आले.आले. मात्र, ती जागा बोहरा समाजाची नसून वफ्फ बोर्डाची असल्याचा नवीन वाद सुरू झाल्याने अधिकारी संभ्रमात पडले. आता भूसंपादनाचा पैसा वफ्फ बोर्डाला द्यावा की बोहरा समाजाला द्यावा या गुंत्यात पुलाचा वापर थांबला आहे. मुख्य पुलावर अशी होते कोंडी शहरात बोरी नदीवर अवघ्या १५० मीटर अंतरावर तीन पूल आहेत. एका पुलाचे दोन्ही टोके रहिवासी वस्तीतून जात असल्याने मोठी वाहने तिकडून जात नाहीत. दगडी दरवाजा जवळ वाहतूक कोंडी होते. बांधकाम व पोलिस विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
भूसंपादन न करता पूल बांधला कसा ? अनेकांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह…
भूसंपादन न करता गांधलीपुरा पूल बांधल्याने सात वर्षापासून वापरविना आहे. पाइप ठेवण्यासाठी व कपडे सुकवण्यासाठी ह्या सात कोटीच्या पुलाचा वापर होत असून कोट्यवधीचा निधी सरळसरळ पाण्यात गेला आहे. त्यामुळे तत्कालीन लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता लक्ष घालून या पुलाचा बाह्य मार्ग धुळे चोपड़ा राज्य मार्ग १५ ला जरी जोडला तर वाहतुकीची कोंडी दूर होऊ शकते.
प्रतिक्रिया…
आम्ही भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र संबंधित जमिनीचे बोहरा समाजाने कोणतेही कागदपत्र अद्याप न दिल्याने ही भूसंपादन प्रक्रिया रखडली आहे. – विजय गांगुर्डे, उपविभागीय अभियंता




