
अमळनेर : राज्य निवडणूक आयोगाने अखेर बराच कालावधी प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका २ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून मतमोजणी ३ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.
या निवडणुकांमधून नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच नगरपंचायतीतील सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल, तर अर्ज मागे घेण्यासाठीची अंतिम मुदत २० नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे.
राज्यभरातील विविध नगरपरिषदांमध्ये स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीसाठी चर्चा सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी प्रचाराचे नियोजन सुरू केले असून नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत अनेक नव्या चेहऱ्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : १७ नोव्हेंबर २०२५
छाननी : १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची मुदत : २० नोव्हेंबर २०२५
मतदान : २ डिसेंबर २०२५
मतमोजणी : ३ डिसेंबर २०२५
या निवडणुकांमुळे शहरी भागातील राजकीय तापमान पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, करआकारणी व स्थानिक विकास ही प्रमुख निवडणूक विषय ठरण्याची शक्यता आहे. गेल्या चार वर्षापासून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले असून इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने उमेदवारी देताना नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.




