
आयोगाने फक्त नावे आणि आकडे दिल्याने पडताळणीसाठी कर्मचाऱ्यांची तारांबळ…
अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात १७ हजार ९११ तर शहरी भागात ५ हजार ४८ असे एकूण २२ हजार ९५९ मतदार संभाव्य दुबार मतदार म्हणून राज्य निवडणूक आयोगाला निष्पन्न झाले आहेत. या मतदारांची खात्री करणे सुरू झाले आहे.
निवडणूक आयोगानेच संभाव्य दुबार मतदार शोधून काढले असून त्यांच्या नावांसह यादी महसूल विभागाला पाठवण्यात आल्या आहेत. यात पंचायत समिती जिल्हा परिषद अंतर्गत निवडणूक विभाग ३४ ते ६८ व निर्वाचक गण ६७ ते ७६ मध्ये १७ हजार ९११ मतदार संभाव्य दुबार म्हणून आढळले आहेत. तर शहरात ५०४८ मतदार संभाव्य दुबार आहेत. आयोगाने फक्त नावे आणि आकडे दिल्याने आता कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे की नेमक्या कोणत्या मतदार संघात दुबार नावे आहेत.
ही नावे शोधून आता बी एल ओ मार्फत पडताळणी केली जाणार आहे. यात अनेक ठिकाणी एकाच नावाची दोन किंवा जास्त व्यक्ती असू शकतात किंवा काहींची नावे दोन ठिकाणी आहेत. सध्या शाळांना सुट्या असल्याने बी एल ओ सुटीवर आहेत. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
एकाच मतदारांचे नाव दोन ठिकाणी असल्यास तो मतदार नेमक्या कोणत्या ठिकाणी मतदान करेल याबाबत बी एल ओ परिशिष्ट एक त्याच्याकडून भरून घेतील त्यानंतर संबंधित मतदाराबाबत त्या याद्यांवर शिक्का मारला जाईल. परिणामी मतदान कर्मचाऱ्यांना तो कुठे मतदान करू शकतो याची माहिती असेल म्हणजे दुबार मतदान होणार नाही. मात्र स्थानिक महसूल प्रशासनाला दुबार मतदारांचे नाव मतदार यादीतून कोणत्याही एका ठिकाणाहून काढण्याचे अधिकार नाहीत. मतदाराने संमती दिल्यावरच त्याचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते.
मात्र अजूनही अनेक मतदार असे आहेत की जे शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी मतदार यादीत आहेत. त्यांची संभाव्य दुबार मतदार यादी आयोगाला शोधता आलेली नाही. तसेच एखाद्याने जरी लिहून दिले की मी ग्रामीण भागात मतदान करेल तरी जिप पंस निवडणुका आणि पालिका निवडणुका वेगवेगळ्या दिवशी होणार असल्याने असे मतदार दोन्ही ठिकाणी मतदान करू शकतील यावर कोणती कारवाई होऊ शकते याबाबत आयोगाने स्थानिक प्रशासनाला कोणतेही निर्देश किंवा मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी नावे असलेले संभाव्य दुबार मतदार शोधणे देखील महत्वाचे आहे.

