
अवैध दारू विकणाऱ्या चौघांना पकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
अमळनेर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पातोंडा येथे छापा टाकून अवैध दारू विकणाऱ्या चौघांना पकडून त्यांच्याकडून देशी ,विदेशी दारू आणि ताडी तसेच मोटरसायकल असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक वाय. वाय. सूर्यवंशी, अमळनेरचे दुय्यम निरीक्षक जी एस मोरे, रघुनाथ सोनवणे, नरेंद्र पाटील, नंदकिशोर पवार, पूनम पाटील यांनी ३ रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजेदरम्यान पातोंडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरात छापा टाकला. त्यांना त्याठिकाणी संजय रघुनाथ कुंभार , भाऊसाहेब श्यामराव वाघ , देविदास संदानशीव, रमेश संदानशिव हे चौघे गावठी दारू , देशी , विदेशी दारू तसेच ताडी बेकायदेशीर रित्या विक्री करताना आढळून आले. राज्य उत्पादन शुल्क कर्मचाऱ्यांनी अवैध दारूच्या बाटल्या आणि मोटरसायकल असे साहित्य जप्त करून आरोपीना ताब्यात घेतले. चौघांवर दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तालुक्यात इतर ठिकाणी ही अवैध दारूची विक्री जोरात असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठराविक ठिकाणी कारवाई न करता तालुक्यात इतरत्र ही कारवाई करावी अशी मागणी होत आहे.




