
गोडाऊन फोडून भांडी बाहेर फेकले तर काहींनी भांडे नेले…
अमळनेर : बांधकाम मजुरांना भांडे घेण्यासाठी बोलावून अचानक आचार संहितेमुळे भांडे वाटप करता येणार नाही असा फलक लावल्याने संतप्त मजुरांनी गोडाऊन फोडून भांडी बाहेर फेकले तर काहींनी घरी नेल्याची घटना ८ रोजी दुपारी मंगरूळ येथे घडली.
शासनाने बांधकाम मंजुरांना मोफत भांडी वाटपाची योजना अनेक महिन्यांपासून अमलात आणली आहे. प्रत्येक तालुक्याला वेगवेगळे ठेकेदार नेमण्यात आले आहेत. अमळनेर येथील ठेका धुळ्याच्या एका एजन्सीला देण्यात आला आहे. नियोजनाच्या अभावामुळे अमळनेर येथे भांडी वाटप करताना खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. तीन ते चार वेळा संतप्त मजुरांनी रस्ता रोको करून सामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. अनेकदा प्रांत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला तर आमदारांच्या घरी देखील मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र आमच्या अखत्यारीतील हा प्रश्न नसल्याने मजुरांना कोणीच न्याय दिला नाही. दरवेळी ठेकेदार मजुरांना बोलावून घेतात आणि भांडी देण्यास टाळाटाळ करतात म्हणून संतापाचा उद्रेक होतो. भांडी घेण्यासाठी ग्रामीण भागातून महिला घराची कामे सोडून लहान मुलांना घरी एकटे सोडून येतात. तासनतास थांबून निराश होऊन खाली हात परत जाण्याचे प्रकार झाले आहेत. वेळ ,पैसे , भाडे खर्च होते पुन्हा पुन्हा चकरा माराव्या लागतात.
८ रोजी देखील मजुरांना संदेश देण्यात आला. मजूर आले आणि आचारसंहिता सुरू असल्याने भांडी वाटप करता येणार नाही आचार संहिता संपल्यावर भांडी वाटप होईल असा फलक लावल्याने संतप्त मजुरांची गोदमातून भांडी काढून बाहेर फेकले तर काहींनी आपल्या वाटेचे भांडे घरी नेले. ठेकेदाराने पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल , हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे ,गजेंद्र पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. कॅमेरे किंवा इतर माहिती घेऊन सखोल चौकशी करून उचित कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. दरम्यान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन अमळनेरचा ठेकेदार बदलवण्यात यावा अशी मागणी होत आहे.




